- कल्लेहोळ गावातील विद्युतपुरवठाही खंडित : हेस्कॉमकडून दुरुस्तीसाठी शर्थीचे प्रयत्न
सुळगा (हिं.) / वार्ताहर
कल्लेहोळ गावाशी बेळगुंदी – राकसकोप या मार्गाशी संलग्न असलेल्या अॅप्रोच रोडवर सोमवारी सात विद्युत खांब आणि एक मोठा वृक्ष कोसळला. त्यामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे. तसेच विद्युतखांब कोसळल्याने कल्लेहोळ गावातील विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे. हेस्कॉमने रात्री उशिरापर्यंत हे खांब उभे करण्यासाठी क्रेनचा उपयोग करून शर्थीचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत चालू ठेवले होते. सदर घटना सोमवार दि. १६ जून रोजी दुपारी एक दीडच्या सुमाराला घडली. सोमवारी कल्लेहोळ गावाशी संपर्क रस्ता असलेल्या बेळगुंदी – राकसकोप अॅप्रोच रोडच्या दुतर्फा असलेला एक मोठा वृक्ष रस्त्याच्या बाजूच्या विद्युत खांबांच्या वायरवरती कोसळला. त्यामुळे सलग सहा ते सात खांब कोसळले. यामधील चार-पाच खांब मोडून रस्त्यावरती कोसळले. विद्युत खांबावर मोठा वृक्ष कोसळल्याने एकमेकांवर अन्य खांबही कोसळल्याने वायरच्या प्रेशरने आणखी तीन खांब असे एकूण सात खांब कोसळले आणि तेही रस्त्यावरती कोसळल्याने रस्त्यावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे.
- रस्ता बंद झाल्याने शेतकऱ्याना शेताकडून येणे झाले कठीण :
शेतावर कामासाठी गेलेले शेतकरी पुन्हा गावाकडे येण्यासाठी त्यांना शेतवडीतूनच अखेर मार्ग काढावा लागेल. तसेच दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावरतीच पार्क करण्याची वेळ या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या प्रवासी वर्गावर येऊन ठेपली आहे.
- रात्री उशीरापर्यंत हेस्कॉमकडून काम सुरू
हेस्कॉम खात्याने तातडीने या ठिकाणी आपले कर्मचारी तसेच क्रेन लावून रस्त्यावरील खांब रात्री उशिरापर्यंत काढण्यात त्यांनी यश मिळवले. मात्र सहा सात खांबांवरील वायर्स पुन्हा वरती ओढणे हे अतिशय अवघड काम असल्याने आणि याचबरोबर जोरदार पावसाचा मारा, परिणामी खड्डे कसे काढावेत हाही मोठा प्रश्न या कर्मचाऱ्यांवरती पडला होता. मात्र यामध्येही त्यांनी आपले काम रात्री उशिरापर्यंत चालू ठेवले होते. मात्र रस्त्याचा काही भाग मोकळा करण्यात त्यांनी यश मिळविले. परिणामी वाहतुकीला बोडी मुभा मिळाली. सदर खांब व वीजतारा काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरूच होते.