- मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा
मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन झाले. गुरुवार १९ जून रोजी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २० जून रोजी, शुक्रवारी विवेक यांच्या पार्थिवावर मुंबईतील अंधेरी परिसरात असणाऱ्या ओशिवरामधील स्मशान भूमीत सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान विवेक लागू यांचे निधनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
विवेक लागू हे दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती होते. तर अभिनेत्री-लेखिका मृण्मयी लागू ही त्यांची मुलगी आहे. विवेक यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वाचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. त्यांनी मराठीसह विविध हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले होते.
त्यांच्या गाजलेल्या कलाकृतींविषयी बोलायचे झाल्यास, टीव्ही चित्रपट ‘गोदावरीने काय केले’ (2008), ‘अग्ली’ (२०१३), ‘व्हॉट अबाउट सावरकर’ (२०१५), ‘३१ दिवस’ (२०१८) इ. कलाकृतींचा उल्लेख करावा लागेल. त्यांंच्या ‘चार दिवस सासूचे’, ‘हे मन बावरे’ या मालिकाही गाजल्या होत्या.