- खासदार जगदीश शेट्टर यांचे निर्देश
- २०२५-२६ वर्षासाठी चौथी त्रैमासिक डीसीसी – डीएलआरसी बैठक
- बैठकीत वार्षिक पत योजना पुस्तिकेचे प्रकाशन
बेळगाव / प्रतिनिधी
सर्व सदस्य बँकांना बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बँक शाखा उघडण्याचे अर्ज लवकरात लवकर पूर्ण करून, सरकारी योजनांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे निर्देश खासदार जगदीश शेट्टर यांनी दिले. सन २०२४-२५ या वर्षासाठी चौथी त्रैमासिक डीसीसी – डीएलआरसी बैठक गुरुवारी शहरातील जिल्हा पंचायत सभागृहात पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. प्रारंभी लीड बँक मॅनेजर प्रशांत घोडके यांनी स्वागत केले. या बैठकीत २०२५ – २६ वर्षासाठी लीड बँक बेळगाव वार्षिक पत योजना पुस्तिका प्रकाशित करण्यात आली.

यानंतर बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी सर्व प्रलंबित सरकार पुरस्कृत प्रकल्प अर्ज निर्धारित वेळेत निकाली काढण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आणि “ऊस कापणी यंत्र” कर्ज प्रस्ताव निर्धारित वेळेत मंजूर केल्याबद्दल निवडक बँकांचे कौतुक केले.
तर बेळगाव कृषी सहसंचालक एच. डी. कोळेकर यांनी बेळगाव जिल्ह्याने कृषी गुंतवणूक निधी योजनेत राज्यात चौथे स्थान आणि एफएमएफई योजनेत प्रथम स्थान मिळवले आहे, अशी माहिती दिली.
रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक महाव्यवस्थापक प्रभाकरन यांनी आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांमधील नवीन बदलांची तर नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक अभिनव यादव यांनी नाबार्डच्या नवीनयोजनांची बैठकीला माहिती दिली.
जन सुरक्षा योजनेअंतर्गत पीएमजेजेबी योजना आणि पीएमएसबी योजनेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कॅनरा बँक, कर्नाटक ग्रामीण बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांना बैठकीत पुरस्कार देण्यात आला. बैठकीला सर्व बँक आणि गुंतवणूक विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.