- शनि मंदिर परिसरात केला रस्ता समतल
बेळगाव : शहरातील रखडलेल्या रस्ते विकास कामांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना, वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम करून वाहनधारकांना दिलासा दिला. संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने पोलिसांनी स्वतःच रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने नागरिकांतून त्यांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
मंगळवारी शनि मंदिर परिसरात रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे लक्षात येताच वाहतूक पोलिसांनी तातडीने कारवाई केली. संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा न करता पोलिसांनी स्वतः कुदळ-फावडी घेऊन माती टाकत रस्ता समतल केला. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली आणि वाहनधारकांना दिलासा मिळाला.
शहरातील विविध भागांत रस्ते विकासाच्या नावाखाली खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, अनेक ठिकाणी कामे अर्धवट अवस्थेत पडून असल्याने वाहनधारकांना धूळ, खड्डे आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पादचाऱ्यांनाही यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
दरम्यान, वाहतूक पोलिसांनी केलेल्या या कामाचे नागरिकांकडून स्वागत होत असले तरी, रस्ते विकास कामांतील दिरंगाईबद्दल प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातील रखडलेली कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.








