- भाविकांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स
- पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
बेळगाव : वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आणि देवस्थान समितीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंगळवारी होणाऱ्या यात्रेसाठी व्यापारी मोठ्या संख्येने वडगावमध्ये दाखल झाले असून, परिसरात यात्रेची लगबग वाढली आहे.
बेळगाव शहर आणि उपनगरातील मोठ्या यात्रांपैकी एक म्हणून श्री मंगाई देवी यात्रेची ओळख आहे. सोमवारी रात्रीपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी गर्दी नियंत्रणाचे नियोजन केले आहे. मंदिर परिसरासह प्रमुख मार्गांवर ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत.
यात्रेदरम्यान गर्दीचे व्यवस्थापन आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी नियमित बंदोबस्तासोबत अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
दरम्यान, देवस्थान समितीनेही यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी तयारीला वेग दिला आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, स्वच्छता तसेच अन्य आवश्यक कामे पूर्ण करण्यात येत आहेत. भाविकांना दर्शन घेताना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर परिसरात आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.
यात्रेनिमित्त तीन ते चार दिवस वडगाव परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे विविध साहित्य व वस्तूंची विक्री करणारे व्यावसायिक मोठ्या संख्येने दाखल झाले असून, परिसरात यात्रेचे वातावरण निर्माण झाले आहे.







