- ४,५०० रुपयांच्या दरावरून वाद
- काचेचे ग्लास फेकल्याने दोन शेतकरी जखमी
बेळगाव : ऊस उत्पादकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारसोबत होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वीच सोमवारी सुवर्ण विधानसौधमध्ये शेतकरी संघटनांच्या दोन गटांत जोरदार संघर्ष झाला. ऊसदराच्या मागणीवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर शाब्दिक चकमक, धक्काबुक्की आणि काचेचे ग्लास फेकण्यापर्यंत पोहोचले. या घटनेत दोन शेतकरी जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
राज्य शेतकरी संघटनेच्या चुनप्पा पुजेरी गट आणि चंद्रशेखर कोडिहळ्ळी गटातील कार्यकर्त्यांमध्ये हा संघर्ष झाला. सुरुवातीला सभागृहातील पिण्याचे पाणी आणि चहाच्या व्यवस्थेवरून वाद सुरू झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, उसाच्या दराबाबत मांडण्यात आलेल्या भूमिकेवरून दोन्ही गटांतील मतभेद उफाळून आले आणि वातावरण तणावपूर्ण बनले.
साखर कारखानदारांसोबतची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर संध्याकाळी शेतकरी संघटनांच्या नेत्यांची बैठक होणार होती. त्यासाठी सुवर्णसौधमधील सभागृहात विविध संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कोडिहळ्ळी गटाचे नेते महंतेश जमादार बोलत असताना आक्षेप घेतल्याने वादाला सुरुवात झाली.
गोंधळ वाढत असताना चुनप्पा पुजेरी यांनी मध्यस्थी करून शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी यंदा उसाला प्रतिटन ४,५०० रुपये दर मिळाल्यास समाधान मानता येईल, अशी भूमिका मांडल्याचे सांगण्यात येते. यावर कोडिहळ्ळी गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. बाहेरच्या आंदोलनात प्रतिटन ५,५०० रुपयांची मागणी केली जात असताना बैठकीत ४,५०० रुपयांवर समाधान का मानायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावर स्पष्टीकरण देताना पुजेरी यांनी उसाचा मूळ दर प्रतिटन ४,५०० रुपये असून, त्यावर राज्य सरकारचे १,००० रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळाल्यास शेतकऱ्यांना एकूण ५,५०० रुपये मिळू शकतात, अशी भूमिका मांडल्याचे समजते. मात्र, या स्पष्टीकरणानंतरही दोन्ही गटांतील वाद थांबला नाही. परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने सभागृहातील वातावरण अधिकच तापले.
वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. यावेळी एका गटातील काही कार्यकर्त्यांनी दुसऱ्या गटाच्या दिशेने पिण्याच्या पाण्यासाठी ठेवलेले काचेचे ग्लास फेकल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधी गटातील कार्यकर्त्यांनीही आक्रमक भूमिका घेतली. या झटापटीत दोन शेतकरी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. काही काळ सभागृहात आरडाओरड आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
आमदार दर्शन पुट्टण्णय्या, शेतकरी नेत्या चुक्की नंजुंदास्वामी आणि अन्य उपस्थितांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप केला. गोंधळात सहभागी असलेल्या दोन शेतकरी नेत्यांना पोलिसांनी सभागृहाबाहेर काढले.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस आयुक्त प्रकाश निकम आणि पोलीस उपायुक्त नारायण बरमनी यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. सुवर्णसौध परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, शेतकरी संघटनांच्या नेत्यांमधील संघर्षामुळे ऊसदर निश्चितीबाबत सरकारसोबत होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर तणाव निर्माण झाला आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दरवाढीच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाची बैठक होण्याची अपेक्षा असतानाच शेतकरी संघटनांमधील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले. त्यामुळे ऊसदराच्या प्रश्नावर एकत्रित भूमिका मांडण्याच्या प्रयत्नांसमोरच नवे आव्हान उभे राहिले आहे.








