• शहरासह तालुक्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस

बेळगाव : उकाड्याने त्रस्त झालेल्या बेळगावकरांना अचानक झालेल्या वळिवाच्या पावसाने मोठा दिलासा मिळाला असला, तरी या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले.

सायंकाळी शहरासह तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आणि नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला.

मात्र, जोरदार पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. गटारे तुडुंब भरून वाहू लागल्याने पावसाचे पाणी बाजारपेठ परिसरात शिरले. यामुळे व्यापारी आणि ग्राहकांची तारांबळ उडाली.

रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

पावसामुळे हवामानात गारवा आला असला, तरी शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.