- ऑक्सफर्डसह तीन जागतिक विद्यापीठांत मोफत शिक्षणाची संधी
बेळगाव : जिद्द, कष्ट आणि समाजाप्रती असलेली निस्वार्थ भावना यांची सांगड घातल्यास यश पुन्हा दार ठोठावते, याचे प्रेरणादायी उदाहरण तृप्ती मल्लाप्पा देसाई हिने घालून दिले आहे. टोरंटो विद्यापीठातील प्रवेशाची संधी विविध शैक्षणिक अडचणींमुळे गमावावी लागल्यानंतरही तिने हार मानली नाही. आता जागतिक स्तरावरील गुणवत्तायादीत चौथा क्रमांक मिळवत तिने ऑक्सफर्ड विद्यापीठ, इम्पीरियल कॉलेज लंडन आणि टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक या जगप्रसिद्ध विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवला आहे.
यापूर्वी तृप्तीची कॅनडातील टोरंटो विद्यापीठात निवड झाली होती. मात्र, भारतातील काही शैक्षणिक प्रक्रियेतील अडचणींमुळे तिला यावर्षी तेथे प्रवेश घेता आला नाही. त्या वेळी मिळालेली तब्बल ९ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती तिने स्वतःसाठी न वापरता गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले होते.
यानंतर मंगळवारी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय समुपदेशन प्रक्रियेत जागतिक गुणवत्तायादीत तृप्तीने चौथा क्रमांक पटकावला. या यशामुळे तिला एकाच वेळी तीन प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये शिक्षणाची संधी मिळाली आहे.
तिची जर्मनीतील टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक (TUM) येथे एम.एस. अभ्यासक्रमासाठी, इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे पीएच.डी.साठी तसेच इम्पीरियल कॉलेज लंडन येथे एम.बी.ए. अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे या तिन्ही अभ्यासक्रमांसाठी तिला संपूर्ण शिष्यवृत्ती मिळाल्याने उच्च शिक्षणाचा सर्व खर्च संस्थांकडून उचलला जाणार आहे.
स्वतःच्या यशाबरोबरच समाजालाही काहीतरी परत देण्याची तृप्तीची भूमिका आणि त्यासाठी केलेला त्याग अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.







