- रेल्वे अडवून रुळावर ठिय्या : आंदोलकांच्या दबावानंतर मार्ग पुन्हा खुला
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावमधील तानाजी गल्ली रेल्वे गेट आधीच वाहन वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, आज रेल्वे विभागाने पादचाऱ्यांचा मार्गसुद्धा बंद केल्याने स्थानिकांचा संताप उफाळून आला. नागरिकांनी थेट रेल्वे रुळांवर उतरून जोरदार आंदोलन छेडले आणि अखेर प्रशासनाला बंद मार्ग पुन्हा सुरू करण्यास भाग पाडले.
तानाजी गल्लीतील रेल्वे गेट परिसरात काही महिन्यांपूर्वीच वाहन वाहतुकीवर निर्बंध आणले गेले होते. यामुळे येथील व्यावसायिक आणि रहिवाशांना त्रास सहन करावा लागत होता. सुरुवातीला पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र वाट उपलब्ध होती. परंतु आज तो मार्गही अडवण्यात आल्याने नागरिक, विशेषतः शाळकरी मुले आणि कामावर जाणाऱ्या महिलांना मोठा फटका बसला.
या निर्णयाचा निषेध करण्यासाठी संतप्त नागरिकांनी रेल्वे रुळांवर ठिय्या आंदोलन करत प्रशासन आणि रेल्वे विभागाविरुद्ध घोषणाबाजी केली. फोर्ट रोड – महाद्वार रोड परिसरात ये – जा करणाऱ्यांची या बंदीमुळे गैरसोय होत होती. एकीकडे वाहनांसाठी आधीच बंदी, आणि दुसरीकडे पादचाऱ्यांनाही मार्ग बंद – या दुहेरी अडचणीमुळे स्थानिकांचा रोष वाढला.
नागरिकांनी सांगितले की, शाळकरी मुलांना वेळेवर शाळेत पोहोचणे अवघड झाले आहे. रिक्षाचालक जादा भाडे आकारत आहेत, तर बाजारपेठेत जाणाऱ्या महिलांना कामावर पोहोचणे कठीण झाले आहे. भिंत हटवून पूर्वीप्रमाणे मार्ग खुला करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली.
श्रीरामसेना हिंदुस्थानचे प्रमुख रमाकांत कोंडुसकर यांनी देखील या समस्येचे तत्काळ निराकरण करण्याचे आवाहन केले. पोलिस अधिकारी आणि रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी येऊन नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या. शेवटी वाढत्या दबावामुळे प्रशासनाने तात्पुरता तो मार्ग पुन्हा खुला केला. पुढील कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, असे प्रशासनाने आश्वासन दिले.