• पूर्वतयारी बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

बेळगाव : आगामी स्वातंत्र्यदिन उत्साह, शिस्त आणि राष्ट्रीय अभिमानाने साजरा करण्यासाठी सर्व विभागांनी आतापासूनच नियोजनबद्ध तयारीला लागावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले. स्वातंत्र्यदिन सोहळ्यादरम्यान ध्वजसंहितेचे काटेकोर पालन करण्याबरोबरच प्लास्टिकच्या ध्वजांचा वापर होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

शुक्रवारी (२४ जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित स्वातंत्र्यदिन पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमासाठी छापण्यात येणारी निमंत्रणपत्रे शिष्टाचारानुसार तयार करून ती मान्यवरांपर्यंत वेळेआधी पोहोचवावीत, तसेच कोणत्याही परिस्थितीत शासकीय प्रोटोकॉलचे उल्लंघन होणार नाही, याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा क्रीडांगणावर होणाऱ्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यासाठी मान्यवरांसोबतच नागरिक, विद्यार्थी आणि उपस्थितांसाठीही पुरेशी व सुयोग्य आसनव्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच शहरातील प्रमुख चौक स्वच्छ करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यावरही भर देण्यात आला.

स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतूक, अल्पोपहार आणि इतर आवश्यक सुविधांची योग्य व्यवस्था करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिल्या.

यशस्वी आणि उत्साहपूर्ण स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून, प्रत्येक समितीने आपली जबाबदारी वेळेत आणि प्रभावीपणे पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले.

या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक तसेच नागरिक उपस्थित होते.