- रामकृष्ण मिशनतर्फे १६ ऑक्टोबरला ‘विवेक आगमन’ कार्यक्रम
बेळगाव : स्वामी विवेकानंद यांच्या बेळगाव भेटीला १३४ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने रामकृष्ण मिशन आश्रमातर्फे शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी रिसालदार गल्ली येथील स्वामी विवेकानंद मेमोरियल येथे ‘विवेक आगमन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम होणार आहेत.
दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० ते रात्री ८.३० या वेळेत भजन आणि प्रवचनांचा कार्यक्रम होईल. बेंगळुरू येथील रामकृष्ण मठाचे स्वामी वीरेशानंद महाराज ‘स्वामी विवेकानंदांचा शक्तिशाली संदेश’ या विषयावर कन्नड भाषेत, तर कोल्हापूर येथील रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी बुद्धानंद महाराज ‘स्वामी विवेकानंदांचे आधुनिक युगाला देणे’ या विषयावर मराठीत प्रवचन देणार आहेत. युवा गायक राजयोग धुरी यांचा भजन कार्यक्रमही होणार आहे. रात्री ८.४५ वाजता प्रसाद वितरण करण्यात येईल. या कार्यक्रमाला भाविकांनी आणि नागरिकांनी उपस्थित राहून स्वामी विवेकानंदांना अभिवादन करावे, असे आवाहन रामकृष्ण मिशन आश्रमातर्फे करण्यात आले आहे.
स्वामी विवेकानंद यांनी १६ ते २७ ऑक्टोबर १८९२ या कालावधीत बेळगावात वास्तव्य केले होते. सुरुवातीचे काही दिवस त्यांनी रिसालदार गल्ली येथील सदाशिव भाते यांच्या घरी, तर त्यानंतर काही दिवस किल्ला परिसरातील तत्कालीन विभागीय वन अधिकारी हरिपाद मित्रा यांच्या घरी मुक्काम केला होता. रिसालदार गल्लीतील भाते यांच्या निवासस्थानी स्वामी विवेकानंद मेमोरियल उभारण्यात आले आहे. स्वामीजींनी बेळगावातील वास्तव्यात वापरलेली खोली, कॉट आणि इतर साहित्य येथे जतन करून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या स्मारकाला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.








