बेळगाव : ‘महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव’ तर्फे बेळगाव दक्षिण, उत्तर, आणि ग्रामीण मतदारसंघातील मतदारांसाठी SIR प्रक्रियेत मदत करण्यासाठी म्हणून सहाय्य वाहिनी (हेल्पलाइन) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सीमाभागात सुरू असलेला SIR प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांना अद्याप बीएलओ (BLO) कडून ‘SIR’ चे अर्ज मिळालेले नाहीत, किंवा कुटुंबातील काही व्यक्तींना अर्ज मिळाले आहेत तर काहींना मिळाले नाहीत, संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्जाची मागणी केली असता आपल्याकडे इतर अर्ज आले नाहीत अशी उत्तरे देत आहेत. तसेच अनेकांना आपले बी.एल.ओ. कोण आहेत? मतदान केंद्र किंवा भागसंख्या काय आहे, याची माहिती नाही.
मतदारांची हीच अडचण दूर करण्यासाठी युवा समितीने ‘विशेष सहाय्य वाहिनी’ (हेल्पलाइन) सुरू केली आहे. या हेल्पलाइनद्वारे नागरिकांना मार्गदर्शन केले जाईल. आपले बी.एल.ओ कोण आहेत? आपला संबंधित अर्ज कोणाकडे मिळेल, याची माहिती दिली जाईल. सीमाभागातील एकाही मराठी बांधवाचे नाव या प्रक्रियेतून सुटू नये, या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
तसेच मागील महानगर पालिकेच्या निवडणुकीत प्रभागांच्या गोंधळामुळे एका घरातील मते वेगवेगळ्या प्रभागात विभागली गेली होती, त्याचा फटका आता SIR प्रक्रिया राबविताना मतदारांना बसत आहे, पत्ता वेगळा आणि प्रभाग वेगळा असल्याने यामुळे बी.एल.ओ सुद्धा गोंधळून गेले आहेत. या गोंधळातून कुठल्याही व्यक्तीचे नाव मतदारयादीतून बाद केले जाऊ नये यासाठी खबरदारी घेणे गरजेचे असून त्याचसाठी म्हणून युवा समितीच्या माध्यमातून हेल्पलाइन सुरू करण्यात येत आहे.
तरी नागरिकांनी SIR अर्जांच्या अडचणीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा , असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केले आहे.
📞 मदतीसाठी संपर्क क्रमांक : अंकुश केसरकर 97399 63229 ; श्रीकांत कदम 9611756529 , सूरज कुडूचकर 8762764593 , प्रतीक पाटील 7338145673 , आशिष कोचेरी 9886103373








