- चिकन, मटण, मासे, खेकडे आणि अंड्यांना वाढती मागणी
- बेळगाव तालुक्यासह शहरात मोठ्या प्रमाणात खरेदी
बेळगाव : श्रावण महिन्याला सुरुवात होण्यापूर्वी बेळगाव शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात मांसाहार विक्रीला चांगलीच तेजी आली. श्रावणात मांसाहार टाळणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने गुरुवारपासून सुरू झालेल्या श्रावणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांत चिकन, मटण, मासे, खेकडे आणि अंड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. त्यामुळे मांसाहार विक्रेत्यांची चांगली उलाढाल झाली.
श्रावण सुरू होण्यापूर्वीच्या दोन दिवसांत सकाळपासूनच मांसाहार विक्रीच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली. शहरातील विविध भागांसह ग्रामीण बाजारपेठांमध्येही नागरिकांनी आपल्या आवडीच्या मांसाहारी पदार्थांची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
ग्रामीण भागात मटणाचा दर सुमारे ८०० रुपये प्रतिकिलो, तर चिकनचा दर सुमारे २३० रुपये प्रतिकिलो होता. दर वाढलेले असतानाही मागणीत घट झाली नाही. उलट श्रावण सुरू होण्यापूर्वी मांसाहार करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने विक्रेत्यांना चांगला व्यवसाय मिळाला.
चिकन आणि मटणाबरोबरच मासे, खेकडे आणि अंड्यांनाही मागणी वाढली होती. विशेषतः मांसाहारप्रेमींनी श्रावण सुरू होण्यापूर्वीच खरेदीला पसंती दिल्याने अनेक ठिकाणी सकाळपासूनच ग्राहकांची वर्दळ वाढली होती.
श्रावण महिन्यात धार्मिक कारणांमुळे मांसाहार टाळणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. त्यामुळे श्रावण सुरू होण्यापूर्वी मांसाहार विक्रीत दरवर्षीच वाढ होताना दिसते. यंदाही त्याचा प्रत्यय आला असून, श्रावण तोंडावर येताच खवय्यांची चंगळ असे चित्र बेळगाव शहर आणि तालुक्यात पाहायला मिळाले.








