• शिवाजी कोण होता ? पुस्तकावर प्रा. दत्ता नाडगौडा यांचे व्याख्यान 

बेळगाव : शिवाजी महाराजांनी नेहमी प्रजेच्या कल्याणाचा विचार केला. म्हणूनच सर्वसामान्य माणसाला म्हणजेच रयतेला ते आपले राज्य वाटत होते. शिवाजी महाराज हे काळाच्या पुढचा विचार करणारे द्रष्टे राजे होते, असे उद् गार  जी. एस. एस. काॅलेजचे निवृत्त प्राध्यापक दत्ता नाडगौडा यांनी काढले.

राज्य मराठी विकास संस्था मुंबईच्या प्रोत्साहनाने व प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात प्रा. नाडगौडा बोलत होते. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी प्रगतिशील लेखक संघाचे उपाध्यक्ष व जागतिक घडामोडीचे अभ्यासक कॉम्रेड अनिल आजगावकर होते.

संघाचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यानंतर जोतिबा अगसीमनी यांच्या हस्ते वक्ते नाडगौडा व अध्यक्ष आजगावकर यांचा पुस्तक भेट देऊन  सत्कार करण्यात आला.

प्रा. नाडगौडा यांनी पुस्तकाचे अभ्यासपूर्ण असे विवेचन केले. ते म्हणाले , शिवाजीचे कार्य हे आपले कार्य आहे असे त्या काळातील रयतेला वाटत होते. याची अनेक उदाहरणे पुस्तकात आहेत. पन्हाळगडचा वेढा, मिर्झाराजे जयसिंह याच्याशी करावा लागलेला नामुष्कीचा तह, आग्र्याहून सुटका, अफझल खानाचा वध आदी प्रसंगात शिवा न्हावी, बाजीप्रभू देशपांडे, मदारी म्हेतर, हिरोजी फर्जंद हे आपला मृत्यू होणार हे माहीत असूनही त्यांनी शिवाजी महाराजांना साथ दिली. आपण मेलो तरी चालेल. पण शिवाजीराजा जगला पाहिजे. शिवाजी करतो ते आपले स्वतःचे कार्य आहे. रयतेसाठी तो करतो आहे ही त्यांची भावना होती. म्हणूननच त्यांनी मृत्युला कवटाळले.  आपल्याला जहागिरी मिळावी किंवा इनाम मिळावा म्हणून ते लढले नाहीत. शिवाजीचे कार्य हे आपले कार्य आहे असे त्यांनी मानले. केवळ सैनिकच नव्हे तर सर्वसामान्य रयतसुद्धा आपल्या परीने सहभागी झाले होते.

आज शिवाजीचे नाव घेऊन जे चालले आहे ते पहाता हा इतिहासाचा विपर्यास आहे. म्हणून शिवाजी समजून घेण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.  ते सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे, असे ते म्हणाले. अनिल आजगावकर यांनी अध्यक्षीय भाषणात शिवाजी महाराज हे इतर राजापेक्षा कसे वेगळे होते हे स्पष्ट केले.

सागर मरगाण्णाचे यांनी सूत्रसंचालन केले. गिरीश कॉंप्लेक्समधील शहीद भगतसिंग सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील बहुसंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.