- मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र दसरा महामंडळातर्फे बेळगावात सत्कार
बेळगाव : शिमोगा येथे आयोजित युवा दसरा राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण सात पदके पटकावली. या स्पर्धेत ८० किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविणारे बेळगावचे प्रशांत खन्नूकर यांचा मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र दसरा महामंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
प्रशांत खन्नूकर यांनी कठोर सराव, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून बेळगावच्या क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक वाढविला. त्यांच्या या यशाबद्दल येळूरचे ज्येष्ठ नेते वामनराव पाटील, पवन जवेकर आणि मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र दसरा महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शरीरसौष्ठवासाठी सातत्यपूर्ण व्यायाम, शिस्त, योग्य आहार आणि कठोर मेहनत आवश्यक असते. या गुणांच्या बळावर प्रशांत यांनी मिळविलेले यश नवोदित शरीरसौष्ठवपटूंसाठी प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष संदीप कामुले, जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी, दिगंबर पवार, ज्योतिबा नाईक, विश्वजीत हसबे, श्रीनाथ पवार, भाऊराव मोहिते, भास्कर चव्हाण, परिश्रम किल्लेकर आणि प्रशांत मोहिते उपस्थित होते.
महामंडळाचे उपाध्यक्ष संदीप कामुले यांनी प्रशांत यांच्या कामगिरीचे कौतुक करताना, राज्यस्तरीय स्पर्धेत मिळविलेले यश बेळगावसाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या आगामी स्पर्धांतील वाटचालीसाठी महामंडळाच्या वतीने शक्य ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले.
प्रशांत खन्नूकर यांच्या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, आगामी स्पर्धांमध्येही त्यांनी अशीच कामगिरी करून बेळगावचे नाव राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उंचवावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.








