- अधिवेशनात गांभीर्याने चर्चा घडवून आणण्याची शिक्षणमंत्र्यांची ग्वाही
खानापूर : शिक्षक भरती प्रक्रियेत भाषिक अल्पसंख्याक उमेदवारांना संधी मिळण्याबाबत आगामी अधिवेशनात गांभीर्याने चर्चा घडवून आणण्याची ग्वाही आरोग्य व अल्पसंख्याक मंत्री यू. टी. खादर यांनी दिली. खानापूर आणि बेळगाव येथील डीएड, बीएड धारक उमेदवारांनी सोमवारी खादर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन शिक्षक भरती प्रक्रियेत मराठी व उर्दू माध्यमाच्या उमेदवारांवर होत असलेल्या अन्यायाकडे त्यांचे लक्ष वेधले.
आगामी शिक्षक भरतीसाठी नुकतीच अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये मराठी आणि उर्दू भाषिक अल्पसंख्याक शाळांमधील रिक्त शिक्षक पदांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप उमेदवारांनी केला. त्यामुळे या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो डीएड व बीएड धारक उमेदवारांचे भवितव्य अधांतरी असल्याचे त्यांनी सांगितले.
उमेदवारांनी शिक्षक भरतीतील पदांची संख्या, भाषिक अल्पसंख्याक शाळांची गरज आणि पात्र उमेदवारांना उपलब्ध होणाऱ्या संधी याबाबत मंत्र्यांना सविस्तर माहिती दिली. संपूर्ण विषय जाणून घेतल्यानंतर यू. टी. खादर यांनी आगामी अधिवेशनात या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधून गांभीर्याने चर्चा घडवून आणण्याची ग्वाही दिली.
यावेळी गणपती बावकर, दामोदर पाटील, मोहन पाटील यांच्यासह खानापूर व बेळगाव परिसरातील डीएड आणि बीएड धारक उमेदवार उपस्थित होते.








