• तीन दिवसांच्या आत वस्तुस्थिती अहवाल सादर करा
  • प्रादेशिक आयुक्तांची मनपा आयुक्तांना सूचना

बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या प्रशासकीय कारभारावरून आता बरखास्तीची शक्यता निर्माण झाली आहे. प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त प्रादेशिक आयुक्त गीता कौलगी यांनी सोमवारी (दि. १७) मनपा आयुक्तांना पत्र पाठवून तीन दिवसांच्या आत वस्तुस्थितीचा सर्वसमावेशक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महापालिका बरखास्तीच्या चर्चेला पुन्हा उधाण आले असून नगरसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे.

शहरातील कन्नड संघटनांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडून ही कार्यवाही करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा कन्नड संघटना कृती समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने १२ ऑगस्ट रोजी प्रादेशिक आयुक्तांची भेट घेऊन महापालिकेच्या कारभारासंदर्भात निवेदन सादर केले होते.

महापालिकेतील शेकडो विकासकामे गेल्या तीन महिन्यांपासून प्रलंबित असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. तसेच महापालिकेतील सत्ताधारी गटाने राज्य सरकारविरोधात संघर्षाची भूमिका घेतल्याने निधी वितरणासह शहरातील विकासकामांवर परिणाम होत असल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. परिणामी शहरातील ५८ प्रभागांच्या विकासाला खीळ बसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

याशिवाय बेळगाव महापालिकेत कर्नाटकाच्या समर्थनार्थ ठराव मांडण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप कन्नड संघटनांकडून करण्यात आला आहे. या सर्व मुद्द्यांसह महापालिकेच्या प्रशासकीय परिस्थितीबाबत अन्य गंभीर बाबीही निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.

या निवेदनाची दखल घेत अतिरिक्त प्रादेशिक आयुक्त गीता कौलगी यांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठविले आहे. निवेदनात उपस्थित करण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांची सखोल तपासणी करून सद्यस्थितीचा सर्वसमावेशक अहवाल तीन दिवसांत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मनपा आयुक्तांकडून अहवाल सादर झाल्यानंतर या प्रकरणातील पुढील हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. महापालिका बरखास्त करण्यासंदर्भात राज्य सरकारकडे शिफारस करण्याच्या प्रक्रियेला यामुळे चालना मिळू शकते, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे आता प्रादेशिक आयुक्तांकडे सादर होणाऱ्या अहवालाकडे नगरसेवकांसह बेळगावकरांचे लक्ष लागले आहे.