बेळगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत, शेतकरी नेते चुन्नप्पा पुजारी यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ गुरुवारी बेळगावातील वकिलांनी कामकाज बंद ठेवून आंदोलन केले. राणी चन्नम्मा सर्कल येथे एकत्र आलेल्या वकिलांनी सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या कारवाईविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
ऊस उत्पादक शेतकरी आपल्या मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत असताना त्यांच्यावर कारवाई करून ताब्यात घेणे अन्यायकारक असल्याचे मत वकिलांनी व्यक्त केले. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी उसाला योग्य भाव मिळावा, यासाठी संघर्ष करत आहेत. मात्र, त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढणे ही शासनाची जबाबदारी आहे. शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असल्याने त्यांच्या हिताचे संरक्षण झाले पाहिजे, अशी भूमिका आंदोलक वकिलांनी मांडली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांची तातडीने मुक्तता करावी आणि ऊस उत्पादकांच्या मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.







