- खानापूर म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय
खानापूर : मुंबईतील उच्चाधिकार समितीच्या बैठकीनंतर सीमाप्रश्नाच्या लढ्याला नवी दिशा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक शिवस्मारक येथे पार पडली. सीमाप्रश्नाची सोडवणूक हेच समितीचे एकमेव उद्दिष्ट असून त्यासाठी संघटितपणे आणि अधिक प्रभावीपणे लढा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी, ८ जुलै रोजी मुंबईत झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीमुळे सर्वोच्च न्यायालयातील सीमावादाच्या लढ्याला नवे बळ मिळाल्याचे सांगितले. केंद्रीय समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषिकांच्या न्याय्य हक्कांसाठीची चळवळ अधिक संघटितपणे सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
सर्वोच्च न्यायालयातील खटल्यासाठी अतिरिक्त ज्येष्ठ वकिलांची नियुक्ती, केंद्र सरकारशी समन्वय वाढविणे तसेच कोल्हापूर येथे दरमहा समन्वय मंत्र्यांची बैठक घेण्यासारख्या मुंबईतील बैठकीत झालेल्या निर्णयांचे स्वागत करण्यात आले. हे निर्णय सीमाप्रश्नाच्या न्यायालयीन लढ्याला अधिक बळ देणारे ठरतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मतदार यादी पुनरीक्षण आणि मराठी भाषिकांचे संघटन अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, धनंजय पाटील, प्रकाश चव्हाण, रमेश धबाले यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.








