• बैलहोंगल पोलिसांची कारवाई
  • फरार आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

बैलहोंगल : सार्वजनिक ठिकाणी दादागिरी करून नागरिकांना त्रास देणाऱ्या तसेच सरकारी अधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी देणाऱ्या कुख्यात गुंडाला बैलहोंगल पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने वॉरंट बजावूनही फरार असलेल्या आरोपीला गुप्त माहितीच्या आधारे ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शिवानंद कोलकार असून, तो बैलहोंगल परिसरात नागरिकांना धमकावणे आणि दहशत निर्माण करण्यासाठी कुख्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले. सरकारी अधिकाऱ्यांवर जातीवाचक शिवीगाळ केल्याचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत त्यांच्यावर दबाव टाकत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपीचा सहभाग असून, त्याच्याविरोधात न्यायालयाने वॉरंट जारी केले होते. मात्र, तो पोलिसांना चकवा देत फरार होता. गुप्त माहितीच्या आधारे बैलहोंगल पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली.

अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, गुन्हेगारीविरोधात पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले आहे.