- शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव व शिवानंद महाविद्यालय, कागवाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
कागवाड : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव तथा शिवानंद महाविद्यालय, कागवाड येथील मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर स्मृतिदिन आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धांमध्ये तब्बल ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपली साहित्यिक व वक्तृत्व प्रतिभा सादर केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. तळवार यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मराठी विभाग प्रमुख तथा शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी, प्रो. बी. डी. दामन्नावर, डॉ. आनंदकुमार जक्कन्नावर, प्रा. मनोज कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. एस. पी. तळवार म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या जिद्द, संघर्ष आणि समृद्ध जीवनानुभवाच्या बळावर मराठी साहित्यात अजरामर स्थान निर्माण केले. त्यांच्या साहित्यामध्ये कष्टकरी, वंचित, शोषित आणि गावकुसाबाहेरील समाजाच्या वेदना, संघर्ष आणि वास्तव जीवनाचे प्रभावी चित्रण आढळते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कादंबऱ्या, कथा आणि साहित्याचा अभ्यास करून सामाजिक जाण विकसित करावी.
ते पुढे म्हणाले, वाचन ही व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली असून समाज समजून घेण्यासाठी पुस्तकांइतका प्रभावी मित्र दुसरा नाही. पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर यांनी आयुष्यभर दुर्मीळ ग्रंथांचे जतन व संवर्धन करून वाचनसंस्कृतीची अमूल्य सेवा केली. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन आणि प्रभावी अभिव्यक्तीची सवय जोपासावी. अशा उदात्त हेतूने या निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानंतर निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. स्पर्धकांनी विविध समकालीन आणि सामाजिक विषयांवर प्रभावी मांडणी करून परीक्षकांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांच्या विचारांची स्पष्टता, भाषाशैली, आशयाची समृद्धता आणि प्रभावी सादरीकरण यामुळे स्पर्धांचा दर्जा उंचावला.
स्पर्धेसाठी ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण सूर्यवंशी आणि डॉ. अमोल पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी स्पर्धकांच्या सादरीकरणाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मराठी विभाग, शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.








