- देऊळगाव येथे मराठी बांधवांकडून काळा दिन
- कर्नाटक सरकारचा निषेध, ‘बेळगाव-कारवार-निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’च्या घोषणा
बेळगाव : १९५६ च्या भाषावार प्रांतरचनेत बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर आदी मराठीबहुल प्रदेश कर्नाटकात समाविष्ट करण्यात आले. या निर्णयाचा निषेध म्हणून दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिन पाळण्यात येतो. यंदा बेळगावात आयोजित निषेध फेरीत सहभागी होता न आलेल्या मराठी बांधवांनी थेट समृद्धी महामार्गावर काळा दिन पाळत सीमाप्रश्नाचा आवाज बुलंद केला.
काशी विश्वनाथ दर्शनासाठी परिवारासह उत्तर भारताच्या यात्रेला गेलेल्या बेळगावातील मराठी बांधवांनी प्रवासादरम्यान समृद्धी महामार्गावरील देऊळगाव येथे प्रतीकात्मक निषेध आंदोलन केले. यावेळी कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवत ‘बेळगाव-कारवार-निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. या घोषणांनी महामार्ग परिसर दणाणून गेला.
महाराष्ट्रापासून मराठीबहुल सीमाभाग वेगळा करण्याचा निर्णय हा मराठी जनतेवर झालेला अन्याय असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. सीमाप्रश्नाचा न्याय्य तोडगा निघून बेळगावसह मराठीबहुल सीमाभागाचा संयुक्त महाराष्ट्रात समावेश होईपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी अनिल पाटील यांनी सीमाभागातील मराठी जनतेला कर्नाटक सरकारकडून भेडसावणाऱ्या विविध अडचणी आणि अन्यायाबाबत आपले विचार मांडले. सीमाप्रश्न अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत असून, मराठी जनतेचा लढा कोणत्याही परिस्थितीत थांबणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रतीकात्मक निषेध आंदोलनात यल्लाप्पा सामाजी, कलाप्पा पाटील, ज्योतिबा मुतगेकर, राजाराम निलजकर, परशराम गुरव, गंगाराम पावटे, गोपाळ डोंणकरी, सुनील पाटील, सुभाष गवी, अनंत गरडे, सखाराम पाटील, चाळोबा भांदुर्गे, शंकर माळवे, सुरेश राजूकर, परशुराम पाटील, परशराम हदगल यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला.
बेळगावात प्रत्यक्ष फेरीत सहभागी होता आले नाही, तरी प्रवासातही सीमाप्रश्नाचा विसर पडू दिला नाही. न्याय्य निकाल लागेपर्यंत मराठी जनतेचा लढा सुरूच राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.








