- ‘विवेकानंद ‘ची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
बेळगाव : येथील कॉलेज रोडवरील सुप्रसिद्ध विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटीची पंधरावी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (२३ सप्टेंबर) रोजी उत्साहात पार पडली. चेअरमन कुमार पाटील अध्यक्षस्थानी होते. सहकार क्षेत्राचे व्यक्तीबरोबरच देशाच्या विकासात ह मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.
गायिका वैष्णवी नाडगौडा हिच्या गणेश वंदनाने सभेस प्रारंभ झाला. चेअरमन व संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर व्हाईस चेअरमन प्रा. दत्ता नाडगौडा यांनी प्रास्ताविक केले. स्वामी विवेकानंद यांच्या विचाराने सोसायटी वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सोसायटीच्या स्थापनेपासून गेल्या पंधरा वर्षातील प्रगतीचा आढावा घेतला.
चेअरमन कुमार पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करताना सोसायटीच्या प्रगतीस मदत केलेल्या ठेवीदार, कर्जदार व सभासदांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
यानंतर सेक्रेटरी पद्मा बाडकर यांनी १४ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त सादर केले. सविता चव्हाण यांनी २०२५-२०२६ सालचा वार्षिक अहवाल, ताळेबंद व नफा तोटा पत्रक आणि संचालक मंडळाने शिफारस केलेली नफा विभागणी यांचे वाचन केले. सोनम मंगणाकर यांनी आर्थिक प्रगतीची आकडेवारी सादर केली. अर्चना दरवंदर यांनी २०२६-२०२७ सालचे अंदाजपत्रक सादर केले. प्रियांका संकेत कुलकर्णी यांनी २०२५-२०२६ सालच्या लेखा परिक्षकांच्या अहवालाचे वाचन केले तर संचालिका पूजा पाटील यांनी २०२६-२०२७ सालाकरिता लेखा परिक्षकाची नियुक्ती करण्याबाबत सूचना मांडली. या सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. ज्येष्ठ संचालक अविनाश कुलकर्णी यांनी प्रशासकीय कामकाज याविषयी मार्गदर्शन केले. तसेच सोसायटीची नवी शाखा सुरु करण्याबाबतच्या पोटनियमातील दुरुस्तीची सूचना मांडली. ती सर्वानुमते मंजूर करण्यात आली.
जामीनदाराची जबाबदारी याविषयी कर्जवसुली अधिकारी विलास पेडणेकर यांनी मराठीत व अनंथा शेट यांनी कन्नडमध्ये मार्गदर्शन केले. यानंतर पिग्मी संकलक प्रविण पाटील, अनंत कुलकर्णी, अंजली देवळी, मनोहर लोकूरकर, चंद्रकांत ढवळे यांचा तसेच सेक्रेटरी पद्मा बाडकर, अर्चना दरवंदर, सोनम मंगणाकर, सविता चव्हाण, विलास पेडणेकर व रोहित दरवंदर या कर्मचाऱ्यांचा व गायिका वैष्णवी नाडगौडा, सूत्रसंचालिका प्रिया कवठेकर यांचा भेटवस्तू देऊन संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर, सभासद सुहास गुर्जर व किशोर काकडे यांनी उपयुक्त सूचना केल्या. तसेच कॉसमॉस बॅंकेच्या कर्मचारी रुपाली हवालदार यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. कर्मचारी रोहित दरवंदर यांनी आभार मानले. वंदे मातरमने सभेची सांगता झाली. गुडसशेड रोड येथील जगन्नाथराव जोशी सभागृहात झालेल्या या सभेस संचालक अरविंद कुलकर्णी, किरण धामणेकर, संकेत कुलकर्णी, प्रशांत पाटील, श्रीमती निता कुलकर्णी यांच्यासह सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








