• विराट कोहलीची स्वप्नपूर्ती ; तब्बल १८ वर्षांनी कोरले ट्रॉफीवर नाव
  • श्रेयश अय्यरचे स्वप्न पुन्हा भंगले

अहमदाबाद : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने अखेर १७ वर्षांची प्रतिक्षा संपवत इतिहास घडवला असून आयपीएलच्या १८ व्या सिझनमध्ये ती चॅम्पियन ठरली आहे. आरसीबीने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामन्यात पंजाब किंग्सवर ६ धावांनी मात करत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले. आरसीबीच्या या विजयासह विराट कोहलीचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्नही पूर्ण झाले आहे. आरसीबीने पंजाबसमोर १९१ रन्सचे टार्गेट ठेवले होते. मात्र शेवटच्या क्षणांपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांसमोर पंजाबला ७ विकेट्स गमावून १८४ धावा करता आल्या. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज यंदा पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचून विजेतेपदाच्या खूप जवळ आला होता. मात्र अंतिम क्षणी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने केलेल्या उत्कृष्ट खेळीने पंजाबचे स्वप्न भंगले.

  • विराट कोहलीची स्वप्नपूर्ती !

विराट कोहलीसाठी हा क्षण अत्यंत भावनिक ठरला. आयपीएलमध्ये अनेक वैयक्तिक विक्रम गाठणाऱ्या या दिग्गज खेळाडूचे संघाला चॅम्पियन बनवण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने याआधी अनेकदा प्लेऑफ आणि फायनल गाठल्या होत्या. पण ट्रॉफी नेहमी हुलकावणी देत होती. यंदा मात्र रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाने सर्व गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये समतोल कामगिरी करत अखेरच्या क्षणी बाजी मारली.

या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. काइल जेमिसनने फिल साल्टला आऊट करून पंजाबचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले, साल्ट १६ धावा करून बाद झाला, तर संघाकडून विराट कोहलीने ४३ धावा केल्या, मयंक अग्रवालने १७ चेंडूत २४ धावा केल्या, ज्यात २ चौकार आणि १ षटकार होता.

  • शेवटच्या १९ धावा करताना पडल्या ४ विकेट :

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शेवटच्या १९ धावा करताना ४ विकेट गमावल्या, तर शेवटच्या ५ षटकात ५८ धावा करताना ५ विकेट गमावल्या. एकेकाळी आरसीबीचा स्कोअर ५ विकेटवर १७१ धावा होता, तर डाव संपला तेव्हा ९ विकेटवर १९० धावा होत्या. दरम्यान, जितेश शर्मा (२४), रोमारियो शेफर्ड (१७), कृणाल पंड्या (४) आणि भुवनेश्वर कुमार (१) आऊट झाले.

  • काइल जेमिसन आणि अर्शदीप सिंगने घेतल्या ३ – ३ विकेट :

पंजाब किंग्जकडून काइल जेमिसन आणि अर्शदीप सिंगने ३ – ३ विकेट घेतल्या. अर्शदीप सिंग देखील महागडा ठरला. त्याने ४ षटकात ४० धावा दिल्या. तर अझमतुल्लाहने ४ षटकात ३५ धावा दिल्या आणि विराट कोहलीच्या रूपात मोठी विकेट घेतली. विजय कुमारने ४ षटकांत ३० धावा देत १ विकेट घेतली आणि युजवेंद्र चहलने ४ षटकांत ३७ धावा देत १ विकेट घेतली.