बेळगाव / प्रतिनिधी
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वनिता विद्यालयातील विद्यार्थिनी संयुक्ता भातकांडेने दहावीत ९५.५२ टक्के गुण मिळविले. याबद्दल तिचा नुकताच सत्कार करण्यात आला. तसेच दानशुरांनी पुढील शिक्षणासाठी तिला आर्थिक मदतही दिली. मूळची भातकांडे गल्लीतील असलेली संयुक्ता सध्या घराची पडझड झाल्याने कुटुंबासमवेत भाडोत्री घरात राहते. तिचे वडील अविनाश लेथ मशिनवर व आई प्रभावती शिनोळीतील काजू फॅक्टरीत रोजंदारीवर कामाला जाते. लहान भाऊ सर्वेश आठवीत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत संयुक्ताने यश मिळविले आहे. तिने अकरावीसाठी जीएसस कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आहे. तिच्या पुढील शिक्षणासाठी तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, मदन बामणे यांनी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली. गणेश काकतकर व सदाशिवनगरमधील त्यांच्या भगिनी माधुरी माळी व मित्रांकडून संयुक्ताला दहा हजारांची मदत करण्यात आली. गीता काकतकर यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला. यावेळी युवा समिती सीमाभागाचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील, हर्षित मोदानी, दुर्वाक पाटील, सर्वेश भातकांडे उपस्थित होते.