• रोटरियन अ‍ॅड. विजयलक्ष्मी मण्णिकेरी यांची अध्यक्षपदी निवड

बेळगाव / प्रतिनिधी

२०२५ – २६ रोटरी वर्षासाठी नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा कोल्हापूर सर्कलजवळील हॉटेल लॉर्ड्स येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात रोटरियन अ‍ॅडव्होकेट विजयलक्ष्मी मण्णिकेरी यांनी अध्यक्षपदाची (President) सूत्रे स्वीकारली. त्यांच्या कार्यकारिणीत रोटरियन कावेरी करुर यांची सचिव (Secretary) तर रोटरियन सुरेखा मुम्मिगट्टी या कोषाध्यक्षा (Treasurer) म्हणून नियुक्ती करण्यात आली.

कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या रोटरियन डॉ. लेनी दा कोस्टा, जिल्हा गव्हर्नर इलेक्ट, रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१७० यांनी प्रेरणादायी भाषणात नेतृत्वगुण, सामाजिक उत्तरदायित्व आणि रोटरीच्या समाजाभिमुख कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. याप्रसंगी असिस्टंट गव्हर्नर रोटरियन उदय जोशी आणि जिल्हा गव्हर्नर नामनिर्देशित रोटरियन अशोक नाईक हे देखील उपस्थित होते. त्यांनी नूतन कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या.

मावळत्या अध्यक्षा रोटरियन रूपाली जनाज यांनी आपल्या कार्यकाळातील कामगिरीचा आढावा घेत नूतन अध्यक्षांकडे कार्यभार सोपवला. तर, रोटरियन अ‍ॅड. विजयलक्ष्मी मण्णिकेरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात “यावर्षी आमचा विशेष भर महिला सक्षमीकरण, आरोग्य सेवा, शिक्षण आणि युवक विकास या क्षेत्रांमध्ये ठोस आणि परिणामकारक प्रकल्पांवर असेल. संघभावना आणि समर्पित नेतृत्वाच्या जोरावर आम्ही समाजात दीर्घकालीन सकारात्मक बदल घडवू.” असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरियन ज्योती कुलकर्णी आणि रोटरियन उर्मिला गणी यांनी केले, तर कार्यक्रम अध्यक्षा रोटरियन डॉ. स्फूर्ती मास्तीहोळी यांनी आभार प्रदर्शन केले. एकंदरीत हा समारंभ उत्साह, प्रेरणा आणि सेवाभावाच्या नव्या संकल्पांसह संपन्न झाला. रोटरी वर्ष २०२५–२६ साठी ही एक प्रेरणादायी सुरुवात ठरली.