कंग्राळी खुर्द / वार्ताहर
पाळीव कुत्रा चावल्यामुळे एक निवृत्त लष्करी अधिकारी गंभीर जखमी झाले. बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द गावात ही घटना घडली आहे. सेवानिवृत्त सुभेदार पुंडलिक गौंडवाडकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून घरात रॉटवायलर जातीचे कुत्रे पाळले होते. त्याच्या पायात काटा रुतल्यामुळे ते लंगडत होते. हे पाहून पुंडलिक यांनी त्याला जवळ बोलावले आणि त्याच्या पायातून काटा काढण्याचा प्रयत्न करत असतानाच, कुत्र्याने अचानक त्यांच्या हाताला खोलवर चावा घेतला. त्याची पकड इतकी मजबूत होती की, त्याला सोडवण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने १० मिनिटे प्रयत्न केले, पण ते सोडायला तयार नव्हते. त्यानंतर साखळीने ओढल्याने कुत्र्याने त्यांचा हाताचा मांसल भाग ओरबाडून काढला आणि मग हात सोडला. तोपर्यंत खूप रक्तस्त्राव झाल्याने त्यांना उपचारासाठी केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सैन्यात सेवा बजावल्यामुळे त्यांनी अत्यंत धैर्याने आणि शांतपणे वेदना सहन केल्या आणि त्यातून सुटका करून घेण्यात यशस्वी झाले. या घटनेमुळे रॉटवायलर जातीचे कुत्रे पाळणाऱ्यांनी अधिक सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.