- अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर थरारक विजय
- २७ वर्षांनंतर क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच जिंकला वर्ल्डकप
- चोकर्सचा डाग पुसला
लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम सामन्यात टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर थरारक विजय मिळवत अखेर इतिहास रचला आणि २७ वर्षांचा “चोकर्स” टॅग पुसून आयसीसी ट्रॉफीवर दुसऱ्यांदा आपले नाव कोरले. टेम्बा बावुमा यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या २०२५ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा चार दिवसांत ५ गडी राखून पराभव केला. यासह १९९८ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत विजय न मिळवू शकलेल्या दक्षिण आफ्रिकेने दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकली.

- रबाडाचा ‘पंजा’, पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला गुंडाळले….
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात ब्यू वेबस्टरने सर्वाधिक ७२ धावा केल्या, ज्यात ११ चौकारांचा समावेश होता. माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने ६६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने सर्वाधिक पाच बळी घेतले, तर डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सनला तीन विकेट घेतले. फिरकी गोलंदाज केशव महाराज आणि एडेन मार्कराम यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतला आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या २१२ धावांवर आटोपला.
- कमिन्ससमोर पहिल्या डावात द. आफ्रिकेच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या
पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची कामगिरीही निराशाजनक होती. परिणामी, संपूर्ण दक्षिण आफ्रिकन संघ १३८ धावांवर ऑलआउट झाला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून डेव्हिड बेडिंगहॅमने सर्वाधिक ४५ धावा केल्या. तर कर्णधार टेम्बा बावुमाने ८४ चेंडूत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३६ धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने सहा विकेट घेतल्या, तर मिचेल स्टार्कला दोन यश मिळाले. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला ७४ धावांची आघाडी मिळाली.
- दुसऱ्या डावात ‘स्टार्क’चा चमत्कार
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाबद्दल बोलायचे झाले तर, कांगारू संघाचा स्कोअर एकेकाळी सात विकेटवर ७३ धावा होता. येथून, यष्टीरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरी आणि मिचेल स्टार्क यांच्या शानदार फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया २०७ धावांपर्यंत पोहोचू शकला. स्टार्कने १३६ चेंडूत ५८ धावा केल्या, ज्यामध्ये पाच चौकारांचा समावेश होता. अॅलेक्स कॅरीने ५० चेंडूत ५ चौकारांसह ४३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडानेही दुसऱ्या डावात शानदार गोलंदाजी केली आणि चार विकेट घेतल्या. तर लुंगी एनगिडीने तीन यश मिळवले. पहिल्या डावातील आघाडीमुळे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला २८२ धावांचे लक्ष्य दिले.
- मार्कराम अन् बावुमासमोर कांगारूंचे सर्व डाव फसले…
२८२ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात ७० धावांवर आपला दुसरा विकेट गमावला. येथून एडेन मार्कराम आणि कर्णधार टेम्बा बावुमा यांनी तिसऱ्या विकेटसाठी १४७ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे काम सोपे झाले. या भागीदारीदरम्यान मार्करामने १०१ चेंडूत ११ चौकारांसह शतक पूर्ण केले. आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा मार्कराम पहिला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ठरला.
दुसरीकडे, हॅमस्ट्रिंग दुखापतीशी झुंजत असतानाही टेम्बा बावुमाने शानदार खेळी केली. बावुमाने १३४ चेंडूत ६६ धावा केल्या, ज्यामध्ये पाच चौकारांचा समावेश होता. विरोधी कर्णधार पॅट कमिन्सने बावुमाला धावबाद केले. आपल्या संघाचा विजय निश्चित केल्यानंतर मार्कराम आऊट झाला. त्याने २२७ चेंडूत १३६ धावांची सामना जिंकणारी खेळी खेळली. या दरम्यान त्याच्या बॅटमधून १४ चौकार आले. मार्कराम बाद झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी फक्त सहा धावांची आवश्यकता होती. टेम्बा बावुमा यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला आहे. लॉर्ड्सवर अंतिम सामन्यात त्यांनी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा चार दिवसांत ५ गडी राखून पराभव केला.