• अग्निशमन दल, पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेने जीवितहानी टळली

बेळगाव : शहरातील रामदेव हॉटेल आणि मुजावर कॉम्प्लेक्ससमोर रविवारी (दि. २८ जून) रात्री साडेदहाच्या सुमारास चालत्या कारला अचानक भीषण आग लागल्याने काही काळ परिसरात घबराट पसरली. अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कारच्या इंजिनमधून दाट धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून बोनेट उघडले. मात्र, त्याचवेळी कारने अचानक पेट घेतला. चालकाने तत्काळ वाहनाबाहेर पडून आग विझवण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीची तीव्रता वाढत गेल्याने अग्निशमन दल आणि पोलीस विभागाला तातडीने पाचारण करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, विक मेहता, डॉ. जगदीश गस्ती, शुभम हुली, शशिकांत आंबेवाडीकर आणि मतीन मकानदार यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी समन्वयाने कार्य करत आगीवर नियंत्रण मिळवले.

या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र, चालक वेळेत बाहेर पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. सामाजिक कार्यकर्ते, पोलीस आणि अग्निशमन दलाने दाखवलेल्या तत्परतेचे व धाडसाचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले.