- मुसळधार पावसामुळे शोधमोहीमेत अडथळे
- आज सकाळपासून पुन्हा शोधकार्य सुरू
खानापूर : गोव्यातील सत्तरी तालुक्यातील ठाणे ग्रामपंचायत हद्दीतील सुरल (सुर्ल) येथील, खानापूर तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या धबधब्यात बेळगावातील २० वर्षीय तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. २८ जून) घडली. आदित्य दीपककुमार सत्पती (वय २०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो मित्रांसमवेत सहलीसाठी गेला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हादई अभयारण्य परिसरातील धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या आदित्यला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही.
घटनेची माहिती मिळताच वाळपई पोलिस, म्हादई अभयारण्याचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रविवारी सायंकाळपर्यंत धबधब्याच्या कोंडीत शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र घाट परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे शोधकार्यात वारंवार अडथळे निर्माण झाल्याने रात्री शोधमोहीम स्थगित करण्यात आली.
आज, सोमवार (दि. २९ जून) सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले असून बचाव पथके तरुणाचा शोध घेत आहेत. आदित्य हा मूळचा ओडिशा राज्यातील असून त्याचे कुटुंब सध्या बेळगावात वास्तव्यास आहे. त्याचे वडील दीपककुमार सत्पती हे निवृत्त नौदल अधिकारी आहेत. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, पावसाळ्यात म्हादई अभयारण्य परिसरातील धबधब्यांवर बेळगाव, खानापूर आणि गोवा परिसरातील पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. वन विभागाने वारंवार इशारे देऊनही काही पर्यटक धोकादायक ठिकाणी प्रवेश करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.








