• २१ वर्षीय तरुणाला अटक ; सीसीबी पोलिसांची कारवाई

बेळगाव : ‘प्रेस’ असे लिहिलेल्या दुचाकीचा वापर करून मेथाम्फेटामाईन या अमली पदार्थाची विक्री व वाहतूक करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाला बेळगाव शहर सीसीबी पोलिसांनी अटक केली. समर्थनगर परिसरात ३ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली.

सीसीबीचे पीआय मंजुनाथ नायक आणि पीएसआय मंजुनाथ भजंत्री यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बेल्लारी नाल्याजवळील समर्थनगर परिसरात छापा टाकला. यावेळी शास्त्रीनगर येथील सत्यम संतोष कवेतिया याला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी आरोपीकडून ४५ हजार रुपये किंमतीचे मेथाम्फेटामाईन आणि २० हजार रुपये किमतीची होंडा ॲक्टिव्हा स्कूटर असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या स्कूटरवर ‘प्रेस’ असा उल्लेख करण्यात आला होता.

या प्रकरणी मार्केट पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. कारवाईबद्दल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सीसीबी पथकाचे कौतुक केले.