• बेळगाव महापालिकेत खाद्य क्षेत्रांसाठी प्रमाणित कार्यपद्धतीवर कार्यशाळा
  • प्राणीप्रेमी आणि नागरिकांच्या सहभागावर भर

बेळगाव : प्राण्यांप्रति करुणा दाखवणे हे माणुसकीचे लक्षण आहे; मात्र सार्वजनिक सुरक्षिततेची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन महापौर प्रीती कामकर यांनी केले. बेळगाव महानगरपालिका, जिल्हा पशु कल्याण संघटना आणि पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी महापालिकेत आयोजित भटक्या कुत्र्यांसाठी खाद्य क्षेत्र निश्चित करण्यासंबंधी प्रमाणित कार्यपद्धतीच्या (एसओपी) कार्यशाळेचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या.

शहरात भटक्या कुत्र्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे संरक्षण आणि नागरिकांची सुरक्षितता यांचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे महापौरांनी सांगितले. भटक्या कुत्र्यांसाठी खाद्य क्षेत्र निश्चित करताना नियोजनबद्ध पद्धतीचा अवलंब करण्यास ही कार्यशाळा मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

उपमहापौर हनुमंत कोंगळी यांनी भटक्या कुत्र्यांसाठी खाद्य क्षेत्र आणि त्यांच्या संरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. प्राण्यांच्या कल्याणाची काळजी घेतानाच कुत्र्यांच्या हल्ल्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठीही प्रभावी व्यवस्था असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राणीप्रेमी आणि नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सूचनांचा विचार करून भटक्या कुत्र्यांसाठी खाद्य व संरक्षण क्षेत्रे निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. या प्रक्रियेबाबत स्पष्टता निर्माण करणे आणि संबंधितांना आवश्यक मार्गदर्शन करणे, हा कार्यशाळेचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यशाळेत ‘ह्युमन वर्ल्ड फॉर ॲनिमल्स’च्या प्रतिनिधी भजंत्री आणि सीमांतिनी यांनी साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी प्रात्यक्षिकांसह भटक्या कुत्र्यांसाठी खाद्य क्षेत्र निश्चित करण्याची पद्धत आणि त्यासंबंधीच्या विविध बाबींची माहिती दिली. पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा विभागाचे डॉ. श्रीकांत गवी यांनी प्रास्ताविक केले, तर महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अधिकारी आणि अभियंता हनुमंत कलादगी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

यावेळी आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष राजू भातकांडे, विकास स्थायी समितीचे अध्यक्ष श्रेयस नाकाडी, नगरसेवक रवी धोत्रे, गिरीश धोंगडी, संदीप जिराग्याळ आणि शंकर पाटील उपस्थित होते. तसेच महापालिकेच्या पर्यावरण विभागातील अभियंते अशोक कुमार सज्जन, प्रवीण कुमार आणि आदिल खान, पेटा (PETA) व अन्य संस्थांचे प्रतिनिधी, प्राणीप्रेमी, नागरिक आणि विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.