• धर्मट्टी गावातील दुर्दैवी घटना ; परिसरात हळहळ

मुडलगी : मुडलगी तालुक्यातील धर्मट्टी गावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी घडली. एका भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघांचाही जीव गेल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत भावांची नावे सागर बाबू मादार (वय १५) आणि प्रवीण बाबू मादार अशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी दोघे भाऊ गावाजवळील ओढ्याकडे पोहण्यासाठी गेले होते. यावेळी धाकटा भाऊ पाण्यात उतरला असता तो अचानक बुडू लागला.

भावाला संकटात पाहून मोठ्या भावाने त्याला वाचविण्यासाठी तत्काळ पाण्यात उडी घेतली. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने ते पाण्याच्या खोल भागात जाऊन बुडाले. काही वेळातच दोघेही पाण्याखाली गेल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. अथक प्रयत्नांनंतर दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.