- इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत तक्रारी
- तीन पेट्रोल पंपांवरील नमुने प्रयोगशाळेत
- जिल्हा प्रशासनाकडून चौकशी सुरू
बेळगाव : पेट्रोलमधील इथेनॉलच्या मिश्रणामुळे वाहनांच्या इंजिनचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पेट्रोलच्या गुणवत्तेची तपासणी सुरू केली आहे. यासाठी बेळगाव शहरातील तीन पेट्रोल पंपांवरील पेट्रोलचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
गुरुवारी पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, तेल विपणन कंपन्यांकडून पुरवठा होणारे पेट्रोल विहित गुणवत्ता मानकांनुसार असणे आवश्यक आहे. मात्र, पेट्रोलमधील इथेनॉलच्या मिश्रणामुळे वाहनांच्या इंजिनचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत.
या तक्रारींची दखल घेत शहरातील तीन पेट्रोल पंपांवरून नमुने संकलित करून प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तपासणी अहवालात पेट्रोलच्या गुणवत्तेत त्रुटी आढळल्यास संबंधित पेट्रोल पंपांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले.








