- दुरुस्तीसाठी तालुका म. ए. समितीच्या वतीने उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बेळगाव तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या संपर्क रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यांची गणेशोत्सवापूर्वी दुरुस्ती करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, या मागणीसाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे गुरुवार, दि. २० रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) कार्यालयात निवेदन देण्यात येणार आहे.
तालुक्यातील अनेक गावांमधील रस्त्यांवर पावसामुळे मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, किरकोळ अपघातांच्या घटनाही घडत आहेत. गणेशोत्सवाला अवघा महिनाभराचा कालावधी असल्याने त्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी आणि आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी समितीकडून करण्यात येणार आहे.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने तातडीने रस्ते दुरुस्तीचे काम हाती घ्यावे आणि गणेशोत्सवाच्या काळात गावागावांतून होणारी वाहतूक सुरळीत राहील, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे.
या निवेदन देण्याच्या कार्यक्रमाला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, नियंत्रण समितीचे सदस्य, युवा आघाडी व महिला आघाडीचे कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच मराठी भाषिकांनी गुरुवार, दि. २० रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस ॲड. एम. जी. पाटील, कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होणगेकर, विठ्ठल पाटील आणि मोनाप्पा पाटील यांनी केले आहे.







