- दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
बेळगाव : शहरातील प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या पांगुळ गल्ली आणि गणपत गल्ली परिसरात मुसळधार पावसानंतर पाण्याचा निचरा न झाल्याने संपूर्ण बाजारपेठ जलमय झाली. विविध विकासकामांसाठी करण्यात आलेल्या खोदाईनंतर योग्य निचरा व्यवस्था न केल्याने पावसाचे पाणी थेट रस्ते, दुकाने आणि व्यापारी आस्थापनांमध्ये शिरले असून, व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात व्यापारी आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पांगुळ गल्ली ही शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या बाजारपेठांपैकी एक मानली जाते. मात्र, पावसाच्या प्रत्येक सरीत येथे पाणी साचण्याची समस्या गंभीर बनत आहे. यावेळीही निचऱ्याचे मार्ग बंद झाल्याने पावसाचे पाणी दुकानांमध्ये घुसले. त्यामुळे व्यापाऱ्यांचा माल भिजून नुकसान झाले, तर रस्त्यावरील विक्रेते आणि फेरीवाल्यांची मोठी गैरसोय झाली.
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला असून, पादचाऱ्यांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागला. पावसाच्या पाण्यासोबत तुंबलेल्या गटारातील पाणीही रस्त्यावर आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुख्य बाजारपेठ असूनही या कायमस्वरूपी समस्येकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. विकासकामांच्या नावाखाली करण्यात आलेल्या खोदाईचे योग्य नियोजन आणि जलनिस्सारणाची व्यवस्था न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आरपीडी सर्कल परिसरातही प्रत्येक पावसाळ्यात गटाराचे पाणी रस्त्यावर येण्याची समस्या कायम असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. लोकप्रतिनिधींकडून वारंवार आश्वासने दिली जात असली तरी कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.








