• पोलीस अधीक्षक के. रामराजन यांचे नागरिकांना आवाहन

बेळगाव : कमी कालावधीत पैसे दुप्पट करून देण्याचे किंवा २० ते ३० टक्के अवाजवी परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपासून नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिला आहे. नागरिकांनी आपल्या कष्टाची कमाई केवळ अधिकृत आणि विश्वासार्ह वित्तीय संस्थांमध्येच गुंतवावी, असे आवाहन त्यांनी केले.

बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना के. रामराजन यांनी अनधिकृत खाजगी कंपन्या आणि संशयास्पद गुंतवणूक योजनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. केवळ शासकीय नोंदणीकृत चिटफंड संस्था आणि अधिकृत बँकांनाच ठेवी स्वीकारण्याची कायदेशीर परवानगी असते, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

कमी कालावधीत मोठा नफा, जादा व्याजदर किंवा पैसे दुप्पट करून देण्याचे आश्वासन देणाऱ्या योजनांमागे फसवणुकीची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा आमिषांना बळी पडू नये आणि कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित संस्थेची अधिकृतता तपासून घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोणताही संशयास्पद आर्थिक व्यवहार, अनधिकृत ठेवी योजना किंवा फसवणुकीचा प्रकार आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. अशा प्रकारे लोकांची दिशाभूल करून फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिला.