बेळगाव : पवित्र श्रावण महिना आणि नागपंचमीच्या निमित्ताने श्री क्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मध्यरात्रीपासून अभिषेक, रुद्राभिषेक, त्रिकाल पूजा आणि पालखी प्रदक्षिणेसह विविध धार्मिक विधी पार पडणार असून, भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
श्रावण महोत्सवाची सुरुवात रात्री १२.३० वाजता पहिल्या अभिषेकाने होणार आहे. समस्त बेळगावकर नागरिकांच्या जनकल्याणासाठी दरवर्षी हा अभिषेक करण्यात येतो. पहाटे ४ वाजेपर्यंत पंचामृत अभिषेक सुरू राहणार असून, त्यानंतर विशेष रुद्राभिषेक आणि त्रिकाल पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ७.३० वाजता मंदिर परिसरातून भव्य पालखी प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. त्यानंतर विशेष महाआरतीने दिवसभरातील धार्मिक कार्यक्रमांची सांगता होईल.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने आकर्षक धार्मिक देखावा साकारण्यात आला आहे. यंदाच्या देखाव्यात राजमहालाच्या माध्यमातून हिंदू वैदिक धर्मातील पवित्र सप्तर्षींची माहिती भाविकांना करून देण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना सप्तर्षींच्या धार्मिक व वैदिक परंपरेची माहिती घेण्याची संधी मिळणार आहे.
श्रावण सोमवार आणि नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्यात आली आहे. विनायक पालकर व त्यांच्या टीमसह राजू लोहार आणि बसवराज हुंदेकर यांच्या सहकार्याने ही सजावट करण्यात आली असून, गेल्या पाच वर्षांपासून ही टीम मंदिरातील देखावे आणि सजावटीची परंपरा जपत आहे.
श्रावणाच्या पहिल्या सोमवारनिमित्त आयोजित सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, तसेच मंदिरातील सप्तर्षींचा धार्मिक देखावा आवर्जून पाहावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.







