बेळगाव : ऑनलाईन औषध विक्री व्यवस्था बंद करण्याच्या मागणीसाठी बेळगाव डिस्ट्रिक्ट रिटेल फार्मसी असोसिएशन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकारकडे मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले.
ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट ऑर्गनायझेशन यांच्या देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा देत बेळगावमधील औषध विक्रेत्यांनी काळ्या फिती बांधून आंदोलन केले. असोसिएशनचे अध्यक्ष बंडू सदलगे, सचिव सुधीर नंजन्नावर आणि उपाध्यक्ष पवन देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
“ऑनलाईन फार्मसी बंद करा” अशा घोषणा देत आंदोलकांनी सरकारकडे आपली भूमिका मांडली. ऑनलाईन माध्यमातून औषध विक्रीमुळे बनावट औषधांचा धोका वाढत असून त्याचा सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा आंदोलकांनी केला. तसेच व्यसनाधीनता वाढवणारी औषधे सहज उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.
निवेदनात पारंपरिक किरकोळ औषध विक्रेत्यांवर आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच डॉक्टरांकडून थेट औषध विक्री होत असल्याने जीएसटी महसुलाचे नुकसान होत असल्याचाही आरोप करण्यात आला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना महेश अनगोळकर यांनी सांगितले की, ऑनलाईन फार्मसी पद्धतीवर कोणतेही प्रभावी नियंत्रण नसल्याने ग्राहकांना कोणती औषधे दिली जात आहेत, याचीही स्पष्ट माहिती मिळत नाही. त्यामुळे सरकारने तातडीने ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली.
डॉक्टरांना थेट औषध पुरवठा करण्याच्या पद्धतीलाही विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट करत, या संदर्भातील नियम रद्द करण्याची मागणी सरकारकडे करण्यात आल्याचे सांगितले.








