- दूधगंगा–वेदगंगा नद्यांना पूर ; सीमावर्ती गावांचा संपर्क तुटला
- प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन
निपाणी : महाराष्ट्राच्या पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, निपाणी तालुक्यातील तीन प्रमुख जोडपूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांतील वाहतूक विस्कळीत झाली असून सीमावर्ती भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दूधगंगा नदीवरील करदगा–भोज जोडणारा मुख्य पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. तसेच वेदगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बारवाड–कन्नूर आणि भोजवाडी–गजवरवाडी या गावांना जोडणाऱ्या पुलांवरही पाणी आले आहे. त्यामुळे या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या अखत्यारीतील राजापूर–जुगुळ पूलही पाण्याखाली गेल्याने सीमावर्ती भागाशी असलेला संपर्क तात्पुरता तुटला आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह अद्याप वेगाने सुरू असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचे वातावरण आहे.
दूधगंगा आणि वेदगंगा नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात किंवा पाण्याखाली गेलेल्या पुलांवरून जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.







