- दि. ७ व ८ ऑगस्ट २०२६ रोजी होणार यात्रा
बेळगाव : मुतगा (ता. जि. बेळगाव) येथील ग्रामदैवत श्री भावकेश्वरी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. श्री देवस्थान समिती, गाव सुधारणा मंडळ, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या संयुक्त बैठकीत यात्रेच्या आयोजनासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून यंदाचा यात्रोत्सव ७ व ८ ऑगस्ट २०२६ रोजी साजरा केला जाणार आहे.
अलीकडेच झालेल्या बैठकीत यात्रेच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी यात्रेची कार्यक्रमपत्रिका निश्चित करण्यात आली असून आयोजनासाठी आवश्यक तयारीला प्रारंभ करण्यात आला आहे. मंदिर परिसराची रंगरंगोटी, स्वच्छता तसेच विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.
यात्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्येही आनंद व्यक्त होत आहे. यात्रेपूर्वी पारंपरिक वार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
निश्चित करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार, १० जुलै रोजी पहिला वार, १७ जुलै रोजी दुसरा वार, २१ जुलै रोजी तिसरा वार आणि २४ जुलै रोजी चौथा वार पाळण्यात येणार आहे. त्यानंतर २८ जुलै रोजी पाचवा वार होईल. ओटी भरण्याच्या धार्मिक विधीनंतर वार कार्यक्रमांची सांगता केली जाईल.
त्यानंतर ७ आणि ८ ऑगस्ट रोजी श्री भावकेश्वरी देवीचा मुख्य यात्रोत्सव विविध धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.








