• धनंजय जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बेळगाव : ग्रामीण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीच्या पुनरीक्षण प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय जाधव यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजय जाधव यांनी दावा केला की, नवीन मतदारांची नावे नोंदविताना बूथ पातळीवरील अधिकाऱ्यांनी (बीएलओ) घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केलेली नाही. त्याऐवजी कार्यालयात बसून माहितीची कॉपी-पेस्ट केल्यामुळे विवाहानंतर महिलांच्या वडिलांच्या नावाऐवजी पतीच्या वडिलांचे नाव नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पती-पत्नींची नोंद भाऊ-बहिणीप्रमाणे झाल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याचा आरोप त्यांनी केला.

याशिवाय, बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील एका विशिष्ट धार्मिक संस्थेच्या कार्यालयातून बूथस्तरीय अधिकाऱ्यांकडून ओटीपी घेऊन मोबाईल ॲपच्या माध्यमातून मतदारांची नावे अपलोड केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. पूर्वी मतदार यादीतून वगळण्यात आलेली नावे बेकायदेशीरपणे पुन्हा समाविष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी याबाबत केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केल्याची माहिती दिली.

मतदार यादीचे उच्च अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुन्हा मॅपिंग करून संपूर्ण प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी भाजप ग्रामीणचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.