- ज्येष्ठ व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांचे प्रतिपादन
- ज्येष्ठ नागरिक संघात व्याख्यान : उद्योगपती शिरीष गोगटे यांच्याहस्ते सत्कार
बेळगाव : “व्यंगचित्र ही केवळ हास्यनिर्मिती करणारी कला नसून मनोरंजनातून समाजप्रबोधन घडवणारी प्रभावी अभिव्यक्ती आहे. म्हणूनच व्यंगचित्रकला ही सर्वात उत्क्रांत कला मानली जाते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांनी केले. येथील ज्येष्ठ नागरिक संघात आयोजित कार्यक्रमात ‘व्यंगचित्र : एक बोलकी कला’ या विषयावरील प्रात्यक्षिकासह व्याख्यानात ते बोलत होते.
बेळगावातील ज्येष्ठ नागरिक संघात आयोजित कार्यक्रमात कुंटे यांनी क्षणार्धात विविध चेहरे आणि भावरेषा साकारत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. व्यंगचित्र म्हणजे काय, ती कशी सुचतात, त्यामागील निरीक्षणशक्ती, अभ्यास, विविध प्रकार आणि व्यंगचित्रांची प्रभावीता याचे त्यांनी अत्यंत रंजक शैलीत विवेचन केले.
यावेळी उद्योगपती शिरीष गोगटे यांनी कुंटे यांचा सत्कार करताना, “जगदीश कुंटे यांच्या कलेचा आम्हाला अभिमान वाटतो. पुण्यात त्यांचा मोठा गौरव झाला, मग बेळगावकरांनी का मागे राहायचे? समस्त बेळगावकर आणि गोगटे कुटुंबातर्फे आम्ही त्यांचा सन्मान करीत आहोत,” असे सांगितले.
गणपतीची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांची फ्रेम तसेच भेटवस्तू देऊन कुंटे यांचा सत्कार करण्यात आला. संघाचे अध्यक्ष विश्वास धुराजी यांनीही त्यांचा गौरव केला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. काही सदस्यांनी पदे सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
सुरेंद्र देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शिवराज पाटील यांनी कुंटे यांचा परिचय करून दिला. के. एल. मजुकर यांनी आभार मानले.








