• खड्डे आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर नागरिक आक्रमक
  • महापालिकेला निवेदन

बेळगाव : मंगाई नगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, सर्वत्र पडलेले खड्डे आणि मूलभूत सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात मंगाई नगर रहिवासी संघ, महिला मंडळ आणि स्थानिक नागरिकांनी शुक्रवारी बेळगाव महानगरपालिकेत धडक देत उपायुक्त उदयकुमार तलवार यांना निवेदन सादर केले. मंगाई यात्रेपूर्वी सर्व समस्या सोडवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

रहिवासी संघाचे अध्यक्ष बंडू केरवाडकर यांनी एल अँड टी कंपनीने विविध भागांत खोदकाम करूनही आजपर्यंत खड्डे न बुजवल्याचा आरोप केला. मंगाई नगर, वझे गल्ली, पाटील गल्ली, विष्णू गल्ली, कारभार गल्ली, यल्लम्मा रोड आणि धामणे रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून वाहनचालक, पादचारी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रिक्षाचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय पावसाचे पाणी रस्त्यावर साचणे, गटारींचा निचरा न होणे, नळ दुरुस्तीचा प्रश्न आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा अशा अनेक मूलभूत समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याची नाराजीही नागरिकांनी व्यक्त केली.

“मंगाई यात्रेपूर्वी आमच्या सर्व समस्या सोडवाव्यात. आठ दिवसांत ठोस कार्यवाही झाली नाही, तर मंगाई यात्रा संपल्यानंतर महानगरपालिका आणि एल अँड टी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा बंडू केरवाडकर यांनी दिला.

निवेदन स्वीकारल्यानंतर उपायुक्त उदयकुमार तलवार यांनी संबंधित विभागामार्फत सर्व समस्यांची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती नागरिकांनी दिली.

मंगाई यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन या प्रश्नांवर किती तत्परतेने उपाययोजना करते, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.