- महात्मा गांधी संस्थेला एस. आर. मोरे यांच्या कडून पंचवीस हजारची पुस्तके भेट
बेळगाव : बिजगर्णी हायस्कूल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एस. आर. मोरे यांनी कावळेवाडी महात्मा गांधी सामाजिक संस्थेला पंचवीस हजार रुपयेची पुस्तके भेट देऊन वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सहकार्य केले आहे. हा पुस्तके प्रदान सोहळा सह्याद्री सोसायटीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर मालोजीराव अष्टेकर उपस्थित होते. सुरूवातीला संस्था अध्यक्ष वाय.पी.नाईक यांनी उपस्थित मान्यवरांचे सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, शाल देऊन स्वागत केले.
आपल्या प्रास्ताविकात वाय. पी. नाईक यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी पुस्तके वाचणे गरजेचे आहे.मातृभाषेतील ज्ञान हे अधिक सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरते ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी या संस्थेने महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. गुरुवर्य एस. आर. मोरे यांनी निवृत्तीनंतरही मराठी भाषेच्या प्रेमाखातर ग्रंथ भेट देऊन दातृत्वाचा आदर्श घालून दिला आहे.हे समाज जडणघडणीमध्ये पवित्र कार्य आहे.त्यांचे ऋण व्यक्त करताना गुरू शिष्याचे नातं अधिक घट्ट बनवते अशा शब्दांत विचार व्यक्त केले.
यावेळी एस. आर. मोरे यांनी अतिशय प्रतिकूल, संघर्षमय जीवनात पुस्तके हिच आधार देणारी ठरतात. भविष्यात मराठी भाषा अधिक बळकट करण्यासाठी हे ग्रंथ भेट देत आहे असे मौलिक विचार व्यक्त केले
याप्रसंगी पी. पी. बेळगावकर, पी. बी. कंग्राळकर, यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मालोजीराव अष्टेकर यांनी ही संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी विधायक प्रेरणादायी कार्य करीत आहे.मराठी भाषा अधिक दृढ होण्यासाठी वाचन, लेखन, चिंतन मनन करणे आवश्यक आहे.विद्यार्थी दशेत वाचनाची गोडी लागली पाहिजे.मराठी साहित्य हे व्यक्तिमत्व विकास घडवते.आत्मविश्वास निर्भय बनवते. समाजात सन्मानानं जगण्याचा अधिकार ही ज्ञान मंदिरं करतात अशा शब्दांत विचार व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर एस. आर. मोरे, मालोजीराव अष्टेकर, पी. पी. बेळगावकर, आदर्श सोसायटीचे अध्यक्ष एस. एम. जाधव, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, संचालक हर्षवर्धन कोळसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी साहित्यप्रेमी कवी शिवाजी शिंदे, बसवंत शहापूरकर, श्रीकांत कदम, के. आर. भास्कर, एम. पी. मोरे ,पी. बी. कंग्राळकर, अनिल कणबरकर, पांडुरंग नाईक आदी साहित्य रसिक उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्याध्यक्ष पी. आर. गावडे व शिक्षक के. जी. मेणसे यांनी आभार मानले.








