कावळेवाडी : येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेच्या वतीने प्राथमिक शाळेचे नवनियुक्त मुख्याध्यापक अविनाश कांबळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष वाय. पी. नाईक यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष ॲड. नामदेव मोरे होते. प्राथमिक शाळेच्या सभागृहात झालेला हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले.

यावेळी शाळेच्या पहिली इयत्तेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचेही मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प, शालेय पुस्तके आणि भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.

मुख्याध्यापक अविनाश कांबळे यांनी शिक्षण क्षेत्रात तब्बल २३ वर्षे सेवा बजावली आहे. त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीची सुरुवात कावळेवाडी येथील याच शाळेतून झाली होती. त्यानंतर त्यांनी उचगाव येथे सहा वर्षे सीआरपी म्हणून जबाबदारी सांभाळली. पुढे यळेबैल शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांना मुख्याध्यापकपदी बढती मिळाली आणि नुकतेच त्यांनी कावळेवाडी शाळेत मुख्याध्यापक म्हणून पदभार स्वीकारला आहे.

ज्या शाळेतून आणि गावातून त्यांच्या सेवेला प्रारंभ झाला, त्याच ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून त्यांचे पुनरागमन झाल्याबद्दल ग्रामस्थ आणि संस्थेने आनंद व्यक्त केला. विद्यार्थी, पालक आणि सहकाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे तसेच शिक्षणाबाबत तळमळ असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून अविनाश कांबळे यांनी विशेष ओळख निर्माण केल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.

या कार्यक्रमात शाळा सुधारणा समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल ॲड. नामदेव मोरे यांचाही शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

तसेच गावातील बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या प्रणाली कणबरकर (९३ टक्के) आणि किरण बुरुड या विद्यार्थ्यांचाही रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी शाळा सुधारणा समितीच्या उपाध्यक्षा तेजस्विनी सुतार, यल्लाप्पा बुरुड, रघुनाथ मोरे, शशिकांत गावडे, राजाराम मोरे, एन. आर. मोरे, मंदीरा ओऊळकर, स्नेहल मोरे, वनिता कणबरकर तसेच ज्ञानेश्वर चिंगळे, निल्लवा हुक्केर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल सवदी यांनी केले.