- चिक्कोडी-निपाणी तालुक्यात पुराची भीती
- सात पूल पाण्याखाली , अनेक गावांचा संपर्क तुटला
चिक्कोडी : महाराष्ट्रातील पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता सीमाभागातही जाणवू लागला आहे. वाढलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून, चिक्कोडी आणि निपाणी तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पुन्हा एकदा पुराची भीती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा ओघ वाढल्याने कल्लोळ गावाजवळ कृष्णा नदीत सध्या सुमारे ७० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे अवघ्या एका दिवसात नदीची पाणीपातळी सुमारे दोन फुटांनी वाढली असून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
कृष्णा नदीसह तिच्या उपनद्यांमधील पाणीपातळी वाढल्यामुळे चिक्कोडी आणि निपाणी तालुक्यातील सात कमी उंचीचे पूल पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये येडूर–कल्लोळ, बावन सौंदत्ती–मांजरी, बारवाड–कुन्नूर, कारदगा–भोज, भोज–शिवापूरवाडी, अक्कोळ–सिद्नाळ आणि हुन्नरगी–ममदापूर या पुलांचा समावेश आहे.
हे पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा थेट संपर्क तुटला असून, नागरिक आणि वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.








