- मराठी मतांवर निवडून आलेल्या नगरसेवकांना जाब विचारण्याचे आवाहन
बेळगाव : कन्नड संघटनांच्या दबावाखाली येऊन बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग असून महाजन अहवाल अंतिम असल्याचा ठराव महापालिकेत मंजूर केल्याच्या निषेधार्थ मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठी मतांच्या बळावर निवडून येऊन राष्ट्रीय पक्षांच्या छत्राखाली राजकारण करणाऱ्या नगरसेवकांनी सीमाप्रश्न आणि मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी समितीच्या बैठकीत करण्यात आली.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची तातडीची बैठक गुरुवारी (८ ऑक्टोबर) मराठा मंदिर येथे झाली. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे होते. बैठकीच्या प्रारंभी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रणजित चव्हाण-पाटील यांनी स्वागत केले, तर सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी मागील बैठकीचा इतिवृत्तांत सादर केला. आगामी तालुका पंचायत व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना प्रकाश मरगाळे यांनी मराठी अस्मिता आणि सीमाप्रश्नाशी निष्ठा असलेल्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. निवडणुकीच्या वेळी मराठी मतांची गरज भासते; मात्र निवडून आल्यानंतर मराठी प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाते, असा आरोप बैठकीत करण्यात आला. हा दुटप्पीपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
मराठी नगरसेवकांच्या प्रभागात समितीच्या सभा घेऊन त्यांच्या भूमिकेचा जाहीर निषेध करावा, अशी मागणी विलास बेळगावकर यांनी केली. सीमाप्रश्न, मराठी भाषा आणि मराठी जनतेच्या हितासाठी नगरसेवकांनी कोणती भूमिका घेतली, याचा जाब मतदारांनी थेट विचारावा, असे त्यांनी सांगितले. मराठी अस्मितेवरील ठरावाला ३५ नगरसेवक गप्प का? महापालिकेत जवळपास ३५ मराठी भाषिक नगरसेवक असतानाही मराठी भाषिकांच्या हिताला बाधा आणणाऱ्या ठरावाला एकाही नगरसेवकाने विरोध केला नाही, याचा जाब मतदारांनी विचारावा, अशी मागणी ग्रामीण तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले यांनी केली.
समितीच्या नावावर एकाच प्रभागातून अनेक उमेदवार उभे राहिल्याने मराठी मतांचे विभाजन होते आणि त्याचा फायदा राष्ट्रीय पक्षांना होतो. त्यामुळे आगामी निवडणुकीत ‘एक प्रभाग, एक अधिकृत समिती उमेदवार’ ही भूमिका स्वीकारून मतविभाजन टाळावे, असे आवाहन चौगुले यांनी केले. मराठी अस्मितेच्या प्रश्नावर मौन बाळगणाऱ्या नगरसेवकांनी जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच १ नोव्हेंबर काळा दिनाबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यांबाबतही त्यांनी भूमिका मांडावी, अशी मागणी करण्यात आली. बैठकीत मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, रणजित चव्हाण-पाटील, राजाराम देसाई, नेताजी जाधव, रामचंद्र मोदगेकर, ॲड. एम. जी. पाटील, शिवाजी खांडेकर, मनोहर संताजी आणि गोपाळ देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला राजू मरवे, जयराम देसाई, अजित पाटील, पांडुरंग सावंत यांच्यासह समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.







