खानापूर : जंगलातून भरकटत गावात आलेल्या एका हरणाचा लोंढा बाजारात कुत्र्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आज सकाळी खानापूर तालुक्यातील लोंढा शहरात हे हरीण अचानक बाजार परिसरात दिसून आले. शहराच्या मध्यवर्ती भागात फिरत असताना भटक्या कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला. जीव वाचवण्यासाठी धावताना हरीण गंभीर जखमी झाले.
घाबरलेल्या अवस्थेत पळत ते जवळच्या वन विभागाच्या कार्यालयाच्या आवारात शिरले. याबाबत माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत हरणाला ताब्यात घेऊन प्राथमिक उपचार सुरू केले.
मात्र, कुत्र्यांच्या हल्ल्यात झालेल्या गंभीर जखमा आणि भीतीमुळे झालेल्या धक्क्यामुळे उपचार सुरू असतानाच हरणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे लोंढा परिसरातील नागरिक आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे.







