- मध्यवर्ती म. ए. समितीचे मराठी बांधवांना उपस्थितीचे आवाहन
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या आवाहनानुसार, राजारामबापू पाटील ललित कला अकादमी महाराष्ट्र राज्य आणि शब्दगंध कवी मंडळ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान पुरस्कार वितरण समारंभ’ शनिवार, १६ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वा. आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम ओव्हरब्रिज खानापूर रोड ओरिएंटल हायस्कूलजवळ, श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. बेळगाव, बेळगाव तालुका आणि खानापूर तालुक्यातील मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर आणि सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले आहे.
या समारंभात डॉ. सुनील कुमार लवटे, सिसिलिया कारवालो, डॉ. विवेकानंद गोपाल, डॉ. सुरेंद्र दरेकर, डॉ. रणधीर शिंदे आणि अनंत कदम यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंतराव पाटील राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. अशोक चौसाळकर आणि प्रतीक पाटील उपस्थित राहणार आहेत.








